पॅरिस : उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत स्वप्नीलने कांस्य पदक जिंकले. स्वप्नीलमुळे खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला पहिल्यांदा वैयक्तिक पदक मिळाले. हे भारताचे २०२४ च्या ऑलिम्पिकमधले तिसरे कांस्य आहे. या पदकाच्या निमित्ताने स्वप्नील कुसाळे कोण आहे ? त्याची आतापर्यंतची कामगिरी काय ? याचीही चर्चा सुरू झाली. चला तर मग जाणून घेऊ, कोण आहे स्वप्नील कुसाळे ?
स्वप्नील कुसाळेचा जन्म ६ ऑगस्ट १९९५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावातील शेतकरी कुटुंबात झाला. त्याने २००९ मध्ये क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेतला. कठोर प्रशिक्षण घेतले. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्याने पुढील नेमबाजी या क्रीडा प्रकारात कारकिर्द घडवण्याचा निर्णय घेतला. त्याने २०१५ मध्ये आशियाई स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कनिष्ठ गटात सुवर्ण पदक जिंकले. तुघलकाबाद येथे झालेल्या नवव्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्याने गगन नारंग आणि चैन सिंग यांच्यापुढे विजय मिळवला. तिरुअनंतपुरममध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्याने सुवर्ण पदक जिंकले. ऑक्टोबर २०२२ मध्ये कैरोत जागतिक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्याने चौथे स्थान पटकावले आणि ऑलिम्पिकचा प्रवेश निश्चित केला. मे २०२४ मध्ये दिल्ली आणि भोपाळ येथील चाचण्यांनंतर त्याची ५० मीटर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत भारतीय ऑलिम्पिक संघात निवड झाली. अंतिम चाचणीत ५वे स्थान मिळवूनही, पहिल्या तीन चाचण्यांमधील गुणांच्या आधारे त्याची संघात दुसरा नेमबाज म्हणून निवड झाली. या संधीचं सोनं करत त्याने पॅरिस येथे उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्य जिंकले.
खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला पहिल्यांदा वैयक्तिक पदक
महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेला नेमबाजीत कांस्य पदक
भारताला ऑलिम्पिकमध्ये तिसरं कांस्य पदक