मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय होताच एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले. एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी तातडीने कामावर रुजू होतील, असे संघटनांकडून सांगण्यात आले.
मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करत असल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
राज्य परिवहनमध्ये सक्रीय असलेल्या ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे एसटीच्या २५१ पैकी बहुसंख्य आगारांमध्ये कामकाज बंद होते. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पगारवाढीची मागणी मान्य होताच संप मागे घेण्यात आला. पगारवाढीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी सलग दोन दिवस झालेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला.
अशी झाली आहे पगारवाढ
सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट साडेसहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. ज्यांच्या पगारामध्ये २०२१ मध्ये पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना २०२१ मध्ये अडीच हजारांची वाढ मिळाली होती, त्यांच्या पगारात चार हजारांची वाढ झाली आहे.