पुणे : राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. याआधी राज्यात मविआची सत्ता आली आणि संधी मिळाली तर राशपकडून मुख्यमंत्री या पदासाठी सुप्रिया सुळेंचे नाव सुवले जाईल अशी चर्चा होती. पण मविआच्या जागावाटपाचे सूत्र जाहीर होण्याआधीच सुप्रिया सुळे यांनी राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे जाहीर केले.
काही दिवसांपूर्वी शिउबाठाचे उद्धव हे सातत्याने मविआतील काँग्रेस आणि राशपच्या नेत्यांकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी करत होते. तर काँग्रेस नेते निवडणूक मविआ म्हणून लढू आणि निकालानंतर नेता ठरवू असे सांगत होते. या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळेंनी राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यामुळे उद्धव यांची अप्रत्यक्षरित्या कोंडी झाली आहे. आता मविआतील घटक पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.