Mon. May 17th, 2021

5000 पूर्वीचा मौर्यकालीन स्तूप वाचवण्यासाठी बौद्धबांधवांचं संमेलन

पुरातत्त्व अभ्यासक भास्कर देवतारे यांनी 19 वर्षांपूर्वी पूर्णा खोऱ्यात केलेल्या उत्खननातून मौर्यकालीन अवशेष असणाऱ्या पुरातत्त्वीय स्थळाचा शोध लावला होता. मात्र आता हे स्तूप सरकार जिगाव प्रकल्पासाठी नष्ट करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. या विरोधात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने बुधवारी शेगांव येथे बौद्धबांधवांनी एक संमेलन घेऊन विरोध दर्शवला.

महत्त्वपूर्ण पुरातत्त्व स्थळ होणार नष्ट?

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर आणि शेगाव तालुक्याच्या काठावरील पूर्णा नदीच्या काठावर भोन नावाचं गाव आहे.

पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या डॉ.बी.सी.देवतारे यांनी त्या ठिकाणी 2001 साली सर्वेक्षण करून उत्खननाचं कार्य हाती घेतलं.

या ठिकाणी प्राचीन मौर्यकालीन अवशेष असल्याचं त्यांना आढळलं. त्यांचं हे कार्य हे उत्खनन 2006 पर्यंत चाललं.

तब्बल 15 हेक्टर परिसरात त्यांना मौर्यकालीन प्राचीन अवशेष आढळले.

त्यात सम्राट अशोककालीन तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा स्तूप आढळला.

खूप सारी प्राचीन बौद्ध प्रतीकं आढळली.

हा स्तूप सम्राट अशोकाने बनवलेल्या 84000 स्तुपांपैकी एक असल्याचा पुरावा मिळाला.

त्याचबरोबर त्या ठिकाणी इरीगेशन कॅनल, तब्बल ३० विहिरी, जुनी वसाहत असलेल्या घरांचे अवशेष सापडले.

संशोधन कार्यातून हे स्थळ सम्राट अशोक आणि तथागत बुद्ध यांच्याशी संबंधित असल्याचं पक्कं झालं

मात्र नांदुरा तालुक्यात उभारण्यात येत असलेला जिगाव प्रकल्पात स्तूप आढळलेली जागा पाण्याखाली जाणार आहे. यामुळे ही जागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या बद्दल पुरातत्व विभागाने नष्ट करण्यासंदर्भात मंजुरीही दिली आहे.

शासनाच्या या निर्णय विरोधात बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आंदोलने सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून शेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्यानमारचे इंटरनॅशनल नॅशनल बुद्धिस्ट कौन्सिल अध्यक्ष भन्ते डॉक्टर यु सदामुनी महाथेरो हे होते, तर बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम तर मार्गदर्शक म्हणून नॅशनल मायनॉरिटी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी प्रा. विलास खरात यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला राज्यभरातून हजारो समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *