हिंगोलीत साडेतीन हेक्टरचा ऊस जळून खाक

हिंगोलीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत साडेतीन हेक्टरचा ऊस जळू खाक झाल्याची घटना घडली आहे. हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यातील परिसरातील आडगाव सिवारातल्या ऊसाला ही आग लागली आहे. लागलेल्या या आगीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
कळमनुरी तालुक्यातील ऊस उत्पादक क्षेत्रात प्रथम दीड हेक्टरच्या ऊसाला आग लागून आगीने रौद्र रुप धारण केले. आणि त्यानंतर ही आग क्षेत्रातील इतर जागेत पसरली. लागलेल्या या आगीत साडेतीन हेक्टरवरचा ऊस भस्मसात झाला आहे. आग विझवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिवाचा आटापिटा केला मात्र ही आग विझवता न आल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाला.
नुकसानीची भरपाई महावितरण कंपनीने देण्याची मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे. या ऊस उत्पादनातून १२ लाखांपर्यंतचे उत्पादन मिळण्याची आशा शेतकरी कुटुंबाला होती. मात्र लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी पडले आहे.