उस्मानाबादमध्ये बससेवा सुरू

राज्यात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही एसटी कर्मचारी कामावर पुन्हा रूजू झाले आहेत तर काही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. अशातच राज्यातील उस्मानाबाद बसस्थानकातून पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरू करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवस बंद असलेली बससेवा अखेर रस्त्यावर धावू लागली आहे. उस्मानाबादमधील बसआगारात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बसस्थानकाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच बससेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ५ बस सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी २ बस या पोलीस बंदोबस्तात रवाना झाल्या. उमरगा आणि तुळजापूर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात ही बससेवा सुरू आहे. जिल्ह्यातील ६ बस आगारातून २ हजार ३६८ पैकी ३२३ एसटी कर्मचारी शनिवारी पुन्हा कामावर रूजु झाले आहेत. तसेच दरम्यान प्रवाशाला वेठीस धरू नका असे आवाहन पोलीसांकडून एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे.