Thu. Jan 27th, 2022

राजकारण्यांचे राग वेगळे पण यांचे राग ऐकावेसे वाटतात – राज ठाकरे

गायक मंडळींचे राग वेगळे, आम्हा राजकारण्यांचे राग वेगळे असून, गायकांचे राग ऐकावेसे वाटतात, आमचे परवडत नाहीत.

यांची घराणी वेगळी आमची घराणी वेगळी. यांच्या घराण्यांमध्ये कोणीही येऊन गाऊ शकतो, आमच्या घराण्यात आमचाच सूर लागतो.

असं मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

गायिका उत्तरा केळकर यांच्या ‘उत्तररंग’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांच्या ‘उत्तररंग’ या पुस्तकाचे प्रकाशन संगीतकार श्रीकांतजी ठाकरे यांच्या पत्नी कुंदा ठाकरे, राज ठाकरे, प्रवीण दवणे, श्रीधर फडके आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते दीनानाथ नाट्यगृह येथे झाले.

त्या वेळी उत्तरा केळकर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या गाजलेल्या गीतांचा कार्यक्रम अशी भरगच्च मेजवानी रसिकांना मिळाली.

रवींद्र साठे, विनय मांडके, मंदार आपटे, मानसी केळकर-तांबे, मधुरा कुंभार आणि संचिता गर्गे हे कलाकार या कार्यक्रमात उपस्थित होते.

या वेळी उत्तरा केळकर यांनी ‘मी तृप्त आहे आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे.

हे काही माझे आत्मचरित्र नाही. ते लिहिण्याएवढी मी मोठीही नाही, पण मला जे काही बरेवाईट अनुभव माझ्या आयुष्यात आले, त्याबद्दल मी प्रामाणिकपणे लिहिले आहे,’ असे मनोगतात त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *