Fri. Sep 30th, 2022

मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

बरेच दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. सगळं ठरलेलं असून शक्य झाल्यास सोमवारी रात्रीपर्यंत देखील शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती आहे. १० ते १२ मंत्री यावेळी शपथ घेतील अशी देखील माहिती आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे. ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्यांना आज सायंकाळपर्यंत मुंबईत येण्याचे निरोप मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे कालच दिल्लीतून परतले होते. त्यांच्या दिल्लीवारीत भाजप श्रेष्ठींकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील मिळाल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट सातत्याने सुनावणीसाठी पुढील तारखा देत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ रखडल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता अधिक विलंब केल्यास जनतेमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे १५ ऑगस्टपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. तब्बल ३८ दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही. मंत्रिमंडळात कोणते चेहरे असणार याची उत्सुकता पाहायला मिळणार आहे. शिंदे गटात मंत्रिपदासाठी चढाओढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.