Fri. May 20th, 2022

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णय! शिकाऊ वाहनचालक परवाना आता घरबसल्या मिळणार!

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवास करण्यावर मर्यादा येत असल्याने अनेकांना शिकाऊ वाहनचालक परवाना काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन खात्यामार्फत नुकताच अध्यादेश काढलेला आहे.

या अध्यादेशानुसार शिकाऊ वाहनचालक परवाना आता घरबसल्या ऑनलाइन आधारकार्डद्वारे मिळू शकणार आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान ६० टक्के मिळाल्यानंतर आणि डॉक्टरचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवता येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांनीसुद्धा परिवहन संकेतस्थळावर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

वाहन वितरकांनासुद्धा त्यांची नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहने यांची नोंदणी आता ऑनलाइनच करता येणार आहे. त्यासाठी मोटर वाहन निरीक्षकांच्या भेटीची किंवा वाहन घेऊन जाण्याची गरज नसेल. यामुळे आता नोंदणीसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच लांबच लांब रांगा लावण्याची, वाहनधारकांना फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आरटीओकडून वेळ उपलब्ध करून दिली जाते. परीक्षेची तारीख कधी लवकर मिळते, तर कधी महिनाभर वाट बघावी लागते. मात्र, या नव्या सुविधेमुळे यात बदल होणार आहे. घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आल्याने बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत.

या निर्णयामुळे कार्यालयात होणारी गर्दी कमी होणार असून, दलाली संपेल आणि भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरील कामांचा भार कमी होणार असून नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

त्याचप्रमाणे ज्या वाहनधारकांकडे आपला आधार क्रमांक नाही त्यांच्यासाठी पूर्वीप्रमाणेच जाऊन नोंद करणे किंवा परवाना काढणे ही सोय चालूच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.