मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी होणार ?

राज्यात सत्तांतर होऊन तीन आठवडे उलटले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सर्व खात्यांचा कारभार पाहात आहेत. मात्र आता अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी होण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्यात एकूण ३० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असे समजते. भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि आशिष शेलार या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे.शिंदे गटातून उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश असेल, अशी सूत्रांची माहिती आहे.
मागील महिन्यात भाजपाचे १०६ आमदार, शिंदे गटातील ५० आणि इतर अपक्षांच्या मदतीने १६४ सदस्यांच्या पाठिंब्यावर नवं सरकार राज्यात स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे सगळ्यांना धक्का देत एकनाथ शिंदे यांची निवड झाली. त्यानंतर काही तासांत घडलेल्या घडामोडीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली. गेल्या २० दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे राज्याचा कारभार पाहत होते. मात्र रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी सातत्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.