लाल महालात लावणी करणं पडलं महागात

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पुनित झालेल्या पुण्यनगरीतील लाल महालात नृत्यांगना वैष्णवी पाटील हिने काही दिवसांपूर्वी लावणीचा व्हिडिओ शूट केला होता. त्यामुळे वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लाल महाल येथे वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे शूट केलं होतं. यानंतर ती रिल्स समाजमाध्यमांवर टाकण्यात आली होती. यानंतर सर्वत्र टिका होऊ लागली होती आणि आज पोलिसांनी तीन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यानंतर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पुण्यातील लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला असताना जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आता हे प्रकरण चिघळत जात असल्याचं पाहून वैष्णवीने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितील. १३ तासांपूर्वी वैष्णवीने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये माफी मागत वैष्णवी म्हणाली की, एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे. काही दिवसांपूर्वी लाल महालात मी चंद्रा गाण्यावर व्हिडिओ केला होता. मी जेव्हा तो व्हिडिओ केला तेव्हा माझ्या ध्यानीमनीही पुढे असं काही होईल याचा विचार आला नाही. पण ती चूक माझ्याकडून झाली आणि ती मी मान्यही करते. तुमच्याप्रमाणेच मी ही एक शिवप्रेमी आहे. जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेस ठेच पोहचवण्याचा माझा कधी हेतू नव्हता आणि पुढेही नसेल. यासाठी मी सर्वांची जाहीर माफी मागते. असं वैष्णवी पाटीलने व्हिडिओ शेअर करत म्हणाली आहे.