Thu. Jun 17th, 2021

पंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहसीन शेख या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने फेसबुकच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. याप्रकरणी भारतीय जनता पक्षातर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारेच मोहसीन शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मर्यादा सोडून केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचा महाराष्ट्र सचिव मोहसीन शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहसीन शेख याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मॉर्फ करून वापरला होता. या फोटोत नरेंद्र मोदी यांना मृत्यूची देवता असलेल्या यमाच्या रूपात दाखवले होते. ही पोस्ट भारतीय जनता पक्षाच्या पुणे सोशल मीडिया टीमच्या निदर्शनास आली. त्यानंतर भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात भाजप पुणे सोशल मीडिया टीमने या संबंधी तक्रार दाखल केली.

पुण्याच्या सायबर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुणे भाजपाचे सोशल मीडिया संयोजक विनीत वाजपेयी हे या प्रकरणातले मुख्य तक्रारदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *