सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. त्यापाठोपाठ आता ‘सीआयएससीई’नेसुद्धा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या परीक्षाही रद्द करण्याची मागणी काही विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत होती. बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते. बारावीच्या परीक्षांबाबत राज्यांनी अभिप्राय दिल्यानंतर पंतप्रधानांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कशा प्रकारे करण्यात येईल, याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील, असे सीबीएसईकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गोवा, अंदमान-निकोबार यांनी परीक्षा घेऊ नये अशी भूमिका मांडली होती. दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या सीबीएसईच्या भूमिकेचे अनुकरण करत राज्यातील शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द केली होती. राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, असा अभिप्राय राज्याने पंतप्रधानांनी दिला होता.
केंद्राचा निर्णय स्वागतार्ह -वर्षा गायकवाड
‘बारावीची परीक्षा रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय स्वागतार्ह आहे. राज्याचा निर्णयही लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य आहे’, असे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.