Thu. Sep 29th, 2022

कारगिल विजय दिवस साजरा

आज देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशासाठी बलिदान दिलेल्या शूर सुपुत्रांच्या शौर्याचे स्मरण केले जात आहे. कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ आणि युद्धातील विजयाचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ जुलै हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ‘ऑपरेशन विजय’च्या यशाचे प्रतीक मानला जातो.

भारतात २६ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९ साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं होतं. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावले होते. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

सुरुवातीला ही एक घुसखोरी आहे आणि काही दिवसांत त्यांना बाहेर काढलं जाईल असं वाटत होतं. मात्र नियंत्रण रेषेवरील स्थिती आणि घुरखोरांच्या नियोजित रणनितीचा मागोवा घेतल्यानंतर हा मोठ्या हल्ल्याचा कट असल्याचा अंदाज भारतीय लष्कराला आला. त्यानंतर भारत सरकार आणि लष्कराने ऑपरेशन विजयची आखणी केली. २ लाख सैनिकांना सीमारेषेवर पाठवलं. हे युद्ध ६० दिवस चाललं आणि २६ जुलै १९९९ रोजी भारताने या युद्धात विजय मिळवला. या विजयात हवाई दलाचाही मोठा वाटा आहे. कारगिलच्या युद्धात साडे पाचशे जवानांना वीरमरण आलं तर १ हजार४०० च्या आसपास जवान जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.