Thu. Sep 29th, 2022

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत

देशात गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असताना पोलीस,आरोग्य कर्मचारी यांच्यासह पत्रकारांनी कोरोना योद्धा म्हणून काम केलं.मात्र गेल्या वर्षीपासून कोरोना काळात काम करताना अनेक पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली यात काही जणांचा मृत्यू देखील झाला.यात पुण्यातील टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता.मात्र केंद्र सरकारकडून पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून पाच लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर झाला होता. त्यानुसार संबंधित समितीच्या बैठकीत देशातील ६७ पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपये मंजूर करण्यात आले. महाराष्ट्रातून पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना ही रक्कम मिळाल्याचे शितल रायकर यांनी सांगितले आहे.

मविआ सरकारने ना चौकशी केली, ना आरोग्यमंत्र्यांनी मदत केली

या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांनाही ५० लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्याची घोषणा केली होती.मात्र आजपर्यंत एकाही कुटुंबाला ही मदत मिळालेली नाही. परंतु केंद्र सरकारने याची दखल घेत पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तात्काळ पाच लाख रुपयांची मदत केली आहे.पांडुरंग रायकर यांचा मृत्यू पुण्यातील कोविड सेंटरमधील अनास्थेमुळे झाला. मात्र या प्रकरणी राज्य सरकारकडून पांडुरंग यांच्या कुटुंबियांना मदत तर लांबच,पण त्याची साधी चौकशीही अजून सुरू झालेली नाही.

केंद्र सरकारने रायकर कुटुंबियांना पाच लाखांची मदत दिली असली तरी राज्य सरकारने वारंवार आश्वासने देऊनही रायकर कुटुंबियांना आजपर्यंत कोणतीही मदत केली नाही, त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी खेद व्यक्त केला. राज्यातील जे १३६ पत्रकार कोरोनाचे बळी ठरले आहेत, त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने केंद्र सरकारकडे मदतीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.