Sat. Jun 12th, 2021

नाशिकमध्ये भुजबळांना कडवं आव्हान?

नाशिक लोकसभा मतदार संघात यंदा चुरशीची लढत बघायला मिळू शकते. एकीकडे राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ यांचं नाव जवळपास निश्चित आहे, तर शिवसेनेच्या हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब राहिलं आहे. मात्र नाशिकमध्ये एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी सरळ लढत होईल असं वाटत असताना, माणिकराव कोकाटेंच्या निमित्तानं आता ही तिरंगी लढत होणार आहे.

छगन भुजबळांचा बालेकिल्ला असल्यानं नाशिक हा कायमच राज्याच्या राजकारणात महत्वाचा मतदारसंघ मानला जातो.

तरीही गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये छगन भुजबळ यांना पराभव बघावा लागला होता.

त्यानंतर त्यांना आणि पुतणे समीर भुजबळ यांना कारावास देखील भोगावा लागला होता.

एकामागून एक घडलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची दैना झाली होती.

राष्ट्रवादीची ही जागा आता काँग्रेसला सोडावी लागते का अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र भुजबळ काका पुतणे बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली.

शरद पवारांच्या नाशिक दौ-यावेळीच समिर भुजबळांचं तिकिट निश्चित झाल्याचं बोललं जातंय.

त्यामुळे गेल्या पाच वर्षात अनेक अडचणींना तोंड देत आता समिर भुजबळ निवडणुकीच्या मैदानात आहेत.

तर दुसरीकडे शिवसेनेकडुन हेमंत गोडसे यांची देखिल उमेदवारी निश्चित मानली जाते आहे.

पाच वर्षांत केलेले काम आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे असलेली नम्र वागणूक यामुळे त्यांना मतदारांची पसंती असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान सध्या तरी भुजबळ विरुद्ध गोडसे सामना लढतीपूर्वीच चांगलाच रंगला आहे

लढत दुरंगी की तिरंगी?

सहा विधानसभा मतदार संघ असलेली नाशिक लोकसभा मतदार संघाची निवडणुक दुरंगी होईल असं वाटत होतं.

अशातच भाजपमध्ये असलेल्या माणिकराव कोकाटेंनी देखिल बंडाची तयारी केली आहे.

पक्षानं तिकिट दिलं नाही तर बंडखोरी करावी लागेल असं थेट आव्हानच कोकाटेंनी भाजपला दिलं आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या थेट लढतीमध्ये भाजपच्या माणिकरावांनी उडी घेतल्यानं नाशिक लोकसभा निवडणुकांची चुरस वाढली आहे.

सिन्नर मतदार संघावर वर्चस्व असलेल्या कोकाटेंच्या पाठीशी एक गठ्ठा मतदान असल्यानं त्यांच्या मैदानात उतरल्याचा थेट फटका नेमका कुणाला बसणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मात्र नाशिकमध्ये तिरंगी लढत आणि ती देखिल चुरशीची होणार अस सध्या तरी चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *