भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनियुक्ती

चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा कायम आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी याबाबत घोषणा केली.
चंद्रकांत पाटील हे आरएसएसचे जवळचे तसेच गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू मानले जातात. चंद्रकांत पाटील हे कोथरुड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
प्रदेक्षाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केलं आहे. अनेक नेत्यांनी याबाबत ट्विट करुन पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच मंगलप्रभात लोढा यांना मुंबईच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे. मुंबई अध्यक्षपदी मराठी चेहरा देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती.
यानुसार आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागेल, अशा चर्चादेखील सुरु होत्या. परंतु मुंबईच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांना कायम ठेवण्यात आले आहे.