Mon. Jan 17th, 2022

अंडाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करा

भारतीय महिलांमध्ये सर्वांधिक आढळून येणारा कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग. जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो. त्याचप्रमाणे महिलांमधील अंडाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करणं गरजेचं आहे. जसे की, पौष्टिक आहाराचे सेवन करणं आणि नियमितपणे व्यायाम केल्यास कर्करोगावर प्रतिबंध करता येऊ शकतं, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.

डॉ. राजेंद्र केरकर यांच्यानुसार महिलांमधील अंडाशयाचा कर्करोग हा हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. विशेष म्हणजे यात सुरुवातीच्या टप्प्यात, पांढरे जाणे, योनीमार्गातील द्रावाला दुर्गंधी येणे किंवा समागमानंतर रक्तस्राव होणे यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इमेजिंग तंत्रज्ञानातही हा आजार कळून येत नाही. त्यामुळे अंडाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

मुख्यतः चाळीशी ओलांडल्यानंतर अनेक महिलांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता तरुण मुलींमध्ये अंडाशयाच्या कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. १०-१५ टक्के अंडाशयाचा कर्करोग झालेल्या महिलांमध्ये अंडाशयाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असतो. शिवाय, यातून बचावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण, यातील अनेक रुग्णांमध्ये या कर्करोगाचे निदान फारच पुढच्या टप्प्यात होते. परंतु, अनेक पुराव्यानिशी समोर आले आहे की, जीवनशैलीत योग्य बदल केल्यास अंडाशयाचा कर्करोग टाळता येऊ शकतो.

अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी काही टिप्सः-

१) वजन नियंत्रणात ठेवा – वजन जास्त असल्यास अंडाशयाचा कर्करोग होऊ शकतो, याबद्दल नक्कीच खात्री देता येत नाही. मुळात वाढीव वजन आणि अंडाशयाचा कर्करोग या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. परंतु, अतिरिक्त वजनामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.

२) शारीरिक हालचाली करा – तुम्हाला व्यायाम करायला आवडत नसेल तर शरीराची हालचाल होईल, अशा गोष्टींमध्ये मन रमवण्यचा प्रयत्न करा. आठवड्यातील पाच दिवस तुम्हाला काय करायच आहे, याबाबत एक वेळापत्रक तयार करा. याशिवाय निरोगी राहण्यासाठी शरीराचे वजन टिकवून ठेवण्याकडे लक्ष केंद्रीत करा. नियमितपणे व्यायाम केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत मिळते, शरीराला ऊर्जा मिळते आणि मनावरील तणाव कमी होतो.
३) आहाराकडे लक्ष द्या – जंकफुड, तेलकट आणि मसालेदार पदार्थाचे सेवन करणे शक्यतो टाळावेत. दररोज जेवणात ताजे फळे, भाज्या, शेंगदाणे, सोयाबीन, गाजर, कडधान्य, संपूर्ण धान्य आणि बियाणे यांचा समावेश करा. बेकरी उत्पादनांपासून दूर रहा. शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळतील असे खाद्यपदार्थांचे सेवन करा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी ची औषध घ्या. याशिवाय जीवनशैलीत योग्य तो बदल करण्यासाठी सर्वप्रथम मदयपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणं टाळणे गरजेचं आहे.

४) गर्भधारणा आणि स्तनपान – तुम्हाला माहिती आहे काय? गर्भधारणा आणि स्तनपान यामुळे स्त्रियांमधील अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतो. स्तनपान केल्याने आईला पुढील आयुष्यात मुख्यतः अंडाशयाचा, स्तनाचा व गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. स्तनपान सुरु असताना महिलेचा शरीरात बरेच संप्रेरके हार्मोनल बदल होत असतात. शरीरातील इस्ट्रोगेन हार्मोनची पातळी कमी राहते. स्तनाचा कॅन्सरचा बहुतांश वेळा या हार्मोनवर अवलंबुन असल्याने गर्भधारणा व कॅन्सरचा रोग टाळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *