‘मेट्रो १’ च्या फेऱ्या आजपासून कमी होणार

राज्य शासनाने लागू केलेल्या कडक नियमांच्या पार्श्वभूमीवर सरकारने खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या प्रवासीसंख्येत घट शक्यता असून या मार्गिकेवरील फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सध्या मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने सोमवारी रात्रीपासून कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मंगळवारपासून मेट्रो फेऱ्या कमी केल्या जातील, असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मंगळवारी प्रवासी संख्या पाहून गरज भासल्यास फेऱ्या वाढवल्या किंवा कमी केल्या जातील, अशी माहिती मेट्रो १ च्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनामुळे गेल्यावर्षी टाळेबंदी लागू झाल्यानंतर मेट्रो सेवा खंडीत करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मेट्रो पुन्हा धावू लागली होती. मात्र तिच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. सध्या मेट्रोच्या दरदिवशी २८० फेऱ्या सुरू होत्या. तसेच कार्यालयीन दिवसात मेट्रोमधून दर दिवशी १ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. सद्यस्थितीत मेट्रोकडून फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने मेट्रो स्थानकावर प्रवाशांचे तापमान तपासले जाईल, सामाजिक अंतर राखण्याची खबरदारी घेण्यात येईल आणि निर्जंतुकीकरण केले जाईल, त्याचबरोबर मास्क घालणे बंधनकारक असेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version