Sat. Jul 4th, 2020

22 जून 1897 : जेव्हा खिंडीतला गणपती नवसाला पावला होता!

22 जून 1897, केसरी वाड्यात कार्यक्रम सुरू होता. लोकमान्य टिळक कार्यक्रमात बसले होते. एक तरुण त्यांच्यापाशी आला. त्यांना वाड्याबाहेर बोलावलं. आणि म्हणाला.. “खिंडीतला गणपती नवसाला पावला” नेमका काय होता या वाक्याचा अर्थ? या वाक्याचा संदर्भ मोठा विलक्षण होता. जनतेवर अत्याचार करणाऱ्या विल्यम चार्ल्स रँडवर गणेश खिंडीमध्ये गोळ्या झाडून चापेकर बंधूंनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात नवा आध्याय रचला होता… पुण्यातील जनतेवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश अधिकारी रँडचा क्रांतीवीर चापेकर बंधूंनी वध केला होता. या वधाची योजनाही अत्यंत धाडसी होती.

पार्श्वभूमी!

पुण्यामध्ये त्या सुमारास प्लेगची जीवघेणी साथ पसरली होती.

घराघरात प्लेगमुळे लोक मरत होते.

अशावेळी रँड या अधिकाऱ्याच्या आज्ञेवरून ब्रिटीश शिपाई घरोघरी जात.

प्लेगचे रोगी तपासणाच्या बहाण्याने शिपाई लोकांच्या घरात घुसत. घराची नासधूस करत. देव्हाऱ्यात बूट घालून जात. स्त्री पुरूषांच्या अंगावर प्लेगची गाठ तर नाही ना, हे पाहाण्याच्या बहाण्याने महिला पुरुषांना सार्वजनिकरीत्या नग्न करत. मारहाण केली जाई. अत्याचार केले जात होते. या सर्वांचा विलक्षण त्रास होऊ लागला होता. या सर्व गोष्टींना जबाबदार असणारा अधिकारी रँड यांलाच संपवून हे अत्याचारांच्या मुळावरच घाव घालण्याची धाडसी योजना आखण्यात आली.

लोकमान्य टिळक यांचा या योजनेला पाठिंबा होता.

22 जून 1897…

क्वीन व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा होत होता.

पुण्यात जंगी मेजवानी आयोजित करण्यात आली होती.

मोठमोठे ब्रिटिश अधिकारी या कार्यक्रमाला निमंत्रित होते.

मध्यरात्री एका ब्रिटिश अधिकाऱ्याची बग्गी निघाली होती.

घोड्यांच्या टापंचा आवाज येत होता.

त्या मागोमाग मागे एक तरुण धावत येत होता.

‘गोंद्या आला रे’ हा परवलीचा शब्द त्याने उच्चारला मात्र… शेजारच्या झाडीतून दामोदर चापेकर हा तरुण बग्गीवर चढून त्याने गोळीबार केला. विल्यम चार्ल्स रँडचा वध झाला.

दामोदरचा बंधू बाळकृष्ण याने त्यापूर्वी रँड समजून बाळकृष्ण चापेकर याने लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.

रँडच्या वधाची कामगिरी फत्ते झाली होती… ही माहिती लोकमान्य टिळक यांना ताबडतोब केसरी वाड्यात जाऊन कळवण्यात आली… त्यांना सांगण्यात आलं… “खिंडीतला गणपती नवसाला पावला”

तिन्ही बंधूंना फाशी

चापेकर बंधू हत्या करून निसटण्यात यशस्वी ठरले होते. मात्र द्रविड बंधूंनी केलेल्या फितुरीमुळे ते पकडले गेले. तेव्हा या पुण्यातल्या खुन्या मुरलीधराजवळ चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांनी द्रविड बंधुंचाही वध करून बदला घेतला. या दोघांनाही नंतर अटक करण्यात आलं. तिन्ही भावांना फाशी देण्यात आली.

दामोदरला 18 एप्रिल 1898 रोजी येरवडा तुरुंगात फाशी चढवण्यात आलं.

वासुदेवला 8 मे 1899 रोजी फाशी देण्यात आलं.

बाळकृष्णालाही 16 मे 1899 रोजी फाशी दिली गेली.

क्रांतीच्या यज्ञात एकाच कुटुंबातील तीनही भावंडाची आहुती जाण्याची भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील ही एकमेव घटना होती. या महान क्रांतीवीरांना www.jaimaharashtranews.com परिवारातर्फे मानाचा मुजरा!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *