त्या वादग्रस्त पुस्तकाबद्दल उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर जय भगवान गोयल यांचं वादग्र्स्त पुस्तक मागे घेण्याचे आदेश श्याम जाजू यांनी दिले आहेत.
पंतप्रधानांची शिवाजी महाराजांशी तुलना केल्या प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळाली.
या सर्व प्रकरणावर माजी खासदार आणि आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले उद्या मंगळवारी प्रतिक्रिया देणार आहेत.
याबाबत स्वत: उदयन राजेंनी फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
उदयनराजे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता रेसिडन्सी कल्ब पुणे येथे या सर्व प्रकरणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन राज्यासह देशभरात वादंग पाहायला मिळाला. अनेक शिवप्रेमींनी सोशल मीडियावरुन या पुस्तकाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
हे पुस्तक जय भगवान गोयल यांनी लिहिले आहे. रविवारी भाजपच्या दिल्ली कार्यालयामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.
महाराजांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. महाराजांच्या नखाची सर देखील येऊ शकत नाही. अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या घटनेबद्दल सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी केला होता.
तसेच शिवरायांच्या वंशजांना यावर आपली प्रतिक्रिया द्या, असे आवाहन केले होते.
यानंतर संभाजीराजेंनी संजय राऊत यांना लगाम घाला. सल्ला उद्धव ठाकरेंना दिला. प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय.
त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती. असे ट्विट संभाजीराजेंनी केलं होतं.
तर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या पुस्तकावर लगेचच बंदी घालण्याची मागणी भाजपा नेतृत्वाकडे केली आहे.
दरम्यान या वादग्रस्त पुस्तकाविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे.