Sat. Nov 27th, 2021

शिवसेना-भाजप युती, भुजबळांना भीती?

राष्ट्रवादीतर्फे माढा मतदारसंघातून अध्यक्ष शरद पवार तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचा चर्चा सुरू आहे. मात्र, आता भाजप शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा तब्बल दोन लाख मतांहून अधिक मताधिक्क्याने पराभव करत विजय मिळवला होता. अर्थात त्यावेळी असणारी मोदी लाट हे त्यामागील एक मुख्य कारण होतं. मात्र आताही युतीवर शिक्कामोर्तब झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे आव्हान वाढणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांचीही ताकद मोठ्या प्रमाणात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही पक्षांत अटीतटीची लढत असते.

नाशिक शहरात भाजपचे 3 आणि शिवसेनेचा एक आमदार असल्याने शहरात भाजप-शिवसेनेची ताकत आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकत आहे

त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काटे की टक्कर होणार हे निश्चित आहे.

त्यातच नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ कुटुंबापैकी एक सदस्य निवडणूक लढणार असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादीचा दावा

युती झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. कारण गेल्या 15 वर्षात भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास काम केले असल्याने राष्ट्रवादीचाच उमेदवार नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडून येईल असा विश्वास राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने व्यक्त केला जात आहे.

 

हेमंत गोडसे यांचं कार्य

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या पाच वर्षात चांगल्या पद्धतीने काम केलं आहे.

त्यामुळे युती झाली नसती तरी, शिवसेनेचाच उमेदवार नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडून आला असता असा विश्वास स्थानिक शिवसेना नेत्यांना आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात जोरदार लढाई झाली होती.

मागच्या निवडणुकीत मोदी लाट मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने याचा फायदा हेमंत गोडसे यांना झाला होता.

हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत विजय मिळवला होता.

यंदा मात्र मोदी लाट ओसरली आहे.

त्यामुळे युती झाली नसती तर सेना उमेदवाराला ही निवडणूक जड गेली असती.

मात्र अखेर युतीवर शिक्कामोर्तब झाल्याने ही निवडणूक चुरशीची होईल असेही अंदाज आहेत.

मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

त्यामुळे आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल असा दावा सेनेचे स्थानिक नेते करत आहेत.

 

एकेकाळी नाशिक जिल्ह्यावर छगन भुजबळ यांची एक मोठी ताकत होती. तसेच अनेक वर्ष छगन भुजबळ यांनी पालकमंत्री म्हणून देखील नाशिक जिल्ह्याचं काम पाहिलां आहे. मात्र, मध्यंतरी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली छगन भुजबळ हे कारागृहात गेल्यानंतर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती. तरी सध्या भुजबळ कारागृहातून बाहेर आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा ते नाशिक जिल्ह्यावर आपलं वर्चस्व निर्माण करतात का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *