Sat. Jun 12th, 2021

कोंबडी पळाली ‘ताटातून’!

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरलेल्या अफवांचा फटका चिकन बाजाराला बसला आहे. कोंबड्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती पसरल्यामुळे राज्यभरासह अमरावती जिल्ह्यातही अनेकांनी चिकनला ‘बायबाय’ केलं आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या 60 टक्के मांसाहार प्रेमींनी चिकन खाणं बंद केल्यामुळे दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पोल्ट्रीफार्म सह चिकन बाजाराला कोट्यवधींचा फटका बसत आहे. तरी राज्य शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांकडे लक्ष देऊन प्रति पक्षी 165 रुपयांची मदत करावी अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, अशी चुकीची माहिती सोशल मीडियातून पसरली आणि व्हायरसच्या भीतीने मांसाहारींनी अचानक चिकन खायचे बंद केलं. अमरावती जिल्ह्यात सध्या 16 लाख बॉयलर कोंबड्या आणि 10 लाख अंड्यांचं उत्पादन प्रतिदिन सुरू आहे. त्याच्या खप सध्या निम्मा झाला आहे. यामुळे पोल्ट्रीफार्म धारक मोठ्या अडचणीत सापडले असून व्यवसायाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

अमरावती शहरातल्या हॉटेल व्यावसायिकांची दररोज 10 ते 12 टन चिकनची मागणी व्हायची. मात्र सध्या हेच प्रमाण 60 टक्क्यांनी घसरली आहे. चिकनची मागणी घटल्याने चिकन विक्रेते तर अडचणीत आले आहेतच, मात्र पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांवरही संकट ओढावलं आहे.

एका 3 किलो वजनाच्या कोंबडीला 210 रुपये खर्च येतो, तर सध्या भाव नसल्यामुळे ती 15 रुपये किलोप्रमाणे 45 रुपयांनी विकल्या जात आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे 165 रुपये प्रति पक्षी सध्या नुकसान होत आहे. अंड्यालाही सध्या केवळ 2.70 रुपये प्रति नग दराने विकावं लागत आहे

कोंबडीची छोटी पिल्लं अगोदर 20 ते 25 रुपये दराने विकली जायची, आता ती दहा ते बारा रुपयांवर आली आहेत. त्यामुळे पोल्ट्रीफार्म मालक अडचणीत आले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी पोल्ट्री फार्म सुरु केले आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीने हा जोडधंदा उद्ध्वस्त होण्याकडे वाटचाल करत आहे. ही अवस्था एकट्या अमरावती जिल्ह्याची नाही तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात हा अफवेचा व्हायरस झपाट्याने पसरतो आहे.

मांसाहारींनी अशा अफवांना बळी न पडता चिकन खात राहावं, असं आवाहन केलं जात आहे. आपल्याकडे चिकन ज्या पद्धतीने शिजवले जाते, त्यानुसार त्यात कोणतेही विषाणू जिवंत राहण्याची शक्यताच नाही. याशिवाय कोंबडी किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कोरोना व्हायरस असल्याची भारतात चिन्हं नाहीत. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांनी मनामध्ये अजिबात शंका बाळगू नये, असं आवाहन अमरावती जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *