Tue. Jun 2nd, 2020

पावसामुळे पालघर पट्ट्यातील चिकूचे शेतकरी संकटात!

राज्यात सध्या पावसाने हाहाःकार माजवलाय. पालघरमध्येही गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. या अतिवृष्टीचा फटका पालघर मधील शेतकऱ्यांना बसलाय. देशात प्रसिद्ध असलेल्या पालघर मधील डहाणू घोलवड येथील चिकू या फळाला फटका बसला असल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवलं आहे.

पालघरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका पालघर मधील साडेपाच हजार हेक्टरवर लागवड असलेल्या चिकू उत्पन्नाला बसला आहे.

सध्या या चिकूंवर फायतोप थोरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

या रोगामुळे चिकूवर बुरशी आली असून जिल्ह्यात 5500 हेक्टर वर असलेले चिकू लागवड शेतकरी संकटात सापडले आहेत.

सध्या या रोगामुळे चिकूची वाढ खुंटली असून लाखो चिकू जमिनीवर गळून पडले आहेत.

जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर वर असलेल्या चिकू लागवडीवर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह गेल्या पिढ्यांपिढ्या सुरू आहे.

मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हा चिकू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

उत्पन्नाचं एकमेव साधन असलेला चिकू नाहीसा झाला असून अजूनही एक वर्ष तरी या झाडांना चिकू येणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

एका बाजूला चिकूवर आलेला रोग तर दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांपासून चिकू पीक विम्याला ही जाचक अटी लावल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

अतिवृष्टीचा फळ बागायतदारांना फटका बसणार असून योग्य त्या फवारण्या केल्या जाव्या असं आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं होतं. तसंच सध्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्यात येईल असे आश्वासन पालघर जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक काशीनाथ तरकसे यांनी दिल आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत केली जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलंय. मात्र पालघर मध्ये अतिवृष्टी होऊन 10 ते 12 दिवसांनी पेक्षाही जास्त दिवस होऊनही शासनाकडून या चिकू उत्पादक शेतकऱ्यांची पंचनामे अजूनही करण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रसिद्ध असलेला चिकू नामशेष होण्याच्या आधी सरकारने योग्य उपाययोजना करावी इतकीच माफक अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *