मुख्यमंत्र्यांकडून 7 जिल्ह्यात ९ एनडीआरएफच्या तुकड्या तैनात

गेल्या दोन वर्षात पावसाची सुरूवात ही वादळांनीच झालेली आपण पाहिली आहे. यंदा देखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व यंत्रणांनी आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यापूर्वी प्रथमच एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन कालावधीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभागाने धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत आदेशीत करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्सुनपूर्व बैठकीत केल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे मान्सुन पूर्वतयारीबाबत बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे सर्व मंत्री उपस्थित होते. यंदाच्या पावसाळ्यात आपण सर्व यंत्रणानी मान्सुनपुर्व सर्व तयारी चांगलीच केली आहे. विशेष पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असुन एन वेळी मदत आणि बचावकार्य करण्याची वेळ येउ नये म्हणूनच पहिल्यांदाच एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी 2 तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी 1 टीम १५ जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची 1 तुकडी नांदेड आणि 1 तुकडी गडचिरोली येथे १५ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल.