Tue. Jan 18th, 2022

पोलीस काकांकडे येऊन धीटुकल्याची वडिलांविरोधात तक्रार!

एरवी ‘मुलं अभ्यास करीत नाहीत, सतत TV पाहतात’ अशी सर्वसामान्य पालकांची तक्रार असते. मात्र जामनेरमधील एका धाडसी मुलाने ‘माझा बाप मला अभ्यास करू देत नाही, TV पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी तक्रार चक्क पोलीस स्टेशनमध्ये येऊन केली. जळगावमधील जामनेर येथील पोलिस स्थानकामध्ये भर पावसात हा मुलगा आपल्या वडिलांची तक्रार घेऊन आला.

पोलिसांनी चौकशी केली असता वडील कसं वागतात, हे सांगू लागला.

तो आला त्यावेळेस त्याच्या अंगावर धड कपडेही नव्हते.

संवेदनशील मनाचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी त्याची विचारपूस करून त्याला नवीन कपडे घेऊन दिले आणि पालकांना बोलावून समजूत घातली.

चिमुकल्याची करूणकथा!

तक्रारदार मुलगा जेमतेम 12 वर्षांचा आहे.

आई शेतात मजुरी करते आणि वडील मिस्त्री काम करतात.

या कुटुंबाला दोन मुलं आणि एक मुलगी आहे.

दोन्ही मुलं शेंगोळे आश्रमशाळेत शिकतात.

सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर पाऊस सुरू असताना मुलगा हाफ चड्डी आणि बनियनवर ओलेत्या स्थितीत पोलीस ठाण्यात आला आणि बापावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागला.

काय होती मुलाची तक्रार?

निरीक्षक इंगळे, पोलीस कर्मचारी नीलेश घुगे यांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली. दुकानात नेलं. तेथून कपडे घेऊन दिले. मुलाने सँडलसुद्धा मागितल्या आणि पोलिसांनी त्याला सँडल्सही घेऊन दिल्या. या चिमुरड्याने आपली व्यथा पोलिसांजवळ मांडली.

अभ्यास करण्याची इच्छा आहे मात्र बाप टीव्ही पाहत राहतो, मला अभ्यास करू देत नाही, मारतो, अशी तक्रार मुलाने केली.

हे ऐकून इंगळे यांनी त्याच्या आई, वडिलांना बोलावलं आणि समज दिली.

या घटनेने त्या मुलाची शिक्षणाबद्दलची असलेली तळमळ दिसून आली.

मात्र आई-वडिलांचे आपल्याला साथ नसल्याचं या मुलाने अधोरेखित केलं.

एरवी पोलीस म्हटलं तर अनेकांना घाबरायला होतं. मात्र या पोलिसाच्या वर्दीत एक माणुसकी असलेला पोलीस काका लपला आहे हे देखील या घटनेत दिसलं. पोलिसातील माणुसकीचेही दर्शनही या प्रसंगात घडलं.

अलीकडच्या काळात आई-वडील सदोदित मोबाईलवर असतात त्याच बरोबर घरातील मोठी मंडळी वेगवेगळ्या सिरीयल बघत तासन् तास घालवत असतात.

मात्र दुसरीकडे या मुलांनी अभ्यास करावा असा आग्रह धरला जातो.

पण आई-वडीलच जर नियमांचं पालन करत नसतील, तर या मुलांकडून अपेक्षा काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या घटनेने पुन्हा एकदा समाजाला विचार करायला लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *