Jaimaharashtra news

तीनही फॉर्मेटमध्ये 5 विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवचा वाढदिवस

मुंबई : टीम इंडियाचा चायनामॅन बॉलर आणि कुलचा जोडीतील ‘कुल’ म्हणजेच कुलदीप यादवचा आज 25 वा वाढदिवस. कुलदीपला वाढदिवसानिमित्त टीम इंडियाच्या खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कुलदीपने आपल्या अवघ्या 2 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत घवघवीत यश संपादन केले आहे. भल्या भल्या बॉलर्सना न जमलेली कामगिरी कुलदीपने केली आहे.

वनडे हॅट्रिक

कुलदीपने वनडे क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. कुलदीपने ही हॅट्रिक ऑस्ट्रेलिया विरुद्ध 21 सप्टेंबर 2017 ला घेतली होती. कुलदीपने मॅथ्यू वेड, एश्टन एगर आणि पॅट कमिन्सला बाद करत ही हॅट्रिक घेतली होती.

तीनही फॉर्मेटमध्ये 5 विकेट घेणारा दुसरा भारतीय

क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये 5 विकेट घेण्याची कामगिरीही कुलदीप यादवने केली आहे. अशी कामगिरी करणारा कुलदीप हा टीम इंडियाचा दुसराच बॉलर आहे. याआधी तीनही फॉर्मेटमध्ये 5 विकेट घेण्याची कामगिरी टीम इंडियाच्या भुवनेश्वर कुमारने केली आहे.

कुलदीप यादवचा मॅजिक बॉल

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 16 जूनला वर्ल्ड कपमधील सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा नेहमीप्रमाणे पराभव केला होता. टीम इंडियाने पाकिस्तानचा डकवर्थ लुईसनुसार 89 धावांनी पराभव केला होता. या सामन्यादरम्यान कुलदीपने आपल्या फिरकीच्या जोरावर बाबर आझमला बोल्ड केले होते.

ज्या बॉलवर कुलदीपने बाबर आझमला बोल्ड केले, त्या बॉलची आयसीसीने प्रंशसा केली होती. ‘वर्ल्ड कप 2019 मधील बेस्ट बॉलपैकी हा एक बॉल’ अशा शब्दात प्रशंसा करत आयसीसीने व्हिडिओ ट्विट केला होता.

तसेच ज्या बॉलवर मी बाबर आझमला आऊट केलं तो बॉल माझ्यासाठी ड्रीम डिलीवरी होती, असे कुलदीप म्हणाला होता.

कुलदीप यादवची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

कुलदीप यादवने आतापर्यंत 6 टेस्ट, 53 वनडे आणि 19 टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

कुलदीपने टेस्ट, वनडे आणि टी-20 या तीनही फॉर्मेटमध्ये 2017 साली पदार्पण केले होते.

कुलदीपने टी-20 आणि वनडेमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध पदार्पण केले होते. तर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केले होते.

अंडर -19 वर्ल्ड कप हॅटट्रिक

युएईत 2014 साली अंडर-19 वर्ल्ड कप खेळण्यात आला होता. या स्पर्धेत कुलदीप यादवने हॅट्रिक घेतली होती.

कुलदीपने ही कामगिरी स्कॉटलंड विरुद्ध केली होती. निक फररार, काइल स्टार्लिंग आणि एलेक्स बाम या तिघांना बाद केले होते.

Exit mobile version