Tue. Oct 26th, 2021

आता विमानतळ सुरक्षेसाठी CISF श्वानांऐवजी ‘रोबो’

स्फोटानं विमानं उडवून देण्याच्या धमक्या, स्फोटके, अंमली पदार्थ आणि सोने तस्करीचे वाढलेले प्रमाण ही आव्हानं सध्या हवाई वाहतुकीसमोर आहेत. विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआयएसएफने (CISF) ही आव्हानं मोडीत काढण्यासाठी सक्षम होण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने आता विमानतळांवर सीआयएसएफच्या श्वानांऐवजी रोबोटिक श्वान तैनात करण्यात येणार आहेत.

सीआयएसएफकडे जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर किंवा बेल्जियन मेलिनोइज या जातींचे श्वान आहेत. तसेच विमानतळांवरील सुरक्षा ही अधिक प्रमाणात मनुष्यबळावर अवलंबून आहे. मात्र आता या दलाने अधिक तंत्रसक्षम होण्याचा विचार केला आहे. त्यादृष्टीनेच विमानतळांवर सुरक्षेसाठी रोबोटिक श्वान तैनात करण्यात येणार आहेत.

हे श्वान विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांजवळील बॅग डोळ्यांद्वारे एक्स-रे स्कॅन करून त्यातील स्फोटकांचा माग काढू शकतात, अशी माहिती सीआयएसएफमधील सूत्रांनी दिली आहे. नुकताच कॅनडामध्ये झालेल्या जागतिक हवाई सुरक्षा परिषदेत याबाबत चर्चा झाली. या परिषदेला सीआयएसएफचे महासंचालक राजेश रंजन आणि अतिरिक्त महासंचालक एम. ए. गणपती उपस्थित होते. सध्या तरी अशा प्रकारचे रोबोटिक श्वान हे ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जपान आणि कोरिया या देशांतील विमानतळांवर तैनात करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *