Sun. Jun 13th, 2021

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कोरोना रोखण्यासाठी विशेष स्वच्छता अभियान

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असताना सर्वच पातळीवर या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली जाऊ लागली आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर प्रशासनानेही त्याच दिशेने पावले टाकत स्वच्छतेला अग्रक्रम देण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिवसातून 6 ते 7 वेळा मंदिरात साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भाविकांनाही मास्क घालण्याचं आणि वैयक्तिक स्वछता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी दररोज लाखभर भाविक पंढरपुरात येत असतात. यात काही परदेशी भाविकांचाही समावेश असतो. अशावेळी दर्शन रांगेत असणारी गर्दी आणि संसर्गजन्य जंतूंचा होणारा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण विठ्ठल मंदिराच्या सफाईला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.

मंदिरातील कोपान् कोपरा आणि अडगळीच्या जागांची हवेच्या प्रेशरने सफाई करण्यात येते. पूर्वी दिवसातून 2 ते 3 वेळा सफाई केली जात असे, आता 6 ते 7 वेळा सफाई केली जाणार आहे. मंदिर प्रशासनाने कोरोना संदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी, याबाबत डिजिटल बोर्ड बनवण्यासही सुरुवात केली आहे. मंदिर, भक्त निवास आणि मंदिर परिसरात हे बोर्ड लावण्यात येणार आहेत.

मंदिर आणि परिसरातील स्वच्छतेची खबरदारी मंदिर प्रशासन घेत असून भाविकांनीही स्वतःची काळजी घेताना आरोग्य विभागाने सूचविलेल्या मास्कचा वापर करण्याचं आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *