Thu. Jun 17th, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असल्याची दखल घेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या १० दिवसांच्या कालावधीत राज्याला ४,३५,००० रेमडेसिविर देण्यात येणार आहे. राज्याचा रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्राने वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

राज्यात गेले काही दिवस रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला होता. जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिविरसाठी रांगा लागायच्या. रेमडेसिविर मिळत नाही म्हणून लोकांचा संताप वाढत असल्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेमडेसिविरचे वाटप करण्याचे आदेश सरकारने काढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन आणि रेमडेसिविर मिळावे अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिविर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत माहिती दिली असून, ‘केंद्र सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचे सर्वाधिक वितरण केलं आहे. नव्याने वितरण जाहीर झालेल्या ५ लाखांपैकी महाराष्ट्राला १,६५,८०० अर्थात ३४ टक्के रेमडेसिवीर दिलं आहे. आतापर्यंतच्या एकूण १६ लाख रेमडेसिवीरपैकी ४,३५,०००आणि तेही केवळ १० दिवसांसाठी!’, असं फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *