Fri. Apr 16th, 2021

‘कामगारांना आवश्यकतेनुसारच कामावर बोलवावे’

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ‘उद्योगजगताने काही काळासाठी कामगारांना आवश्यकतेनुसारच कारखान्यामध्ये कामावर बोलवावे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, घरातून काम करणे शक्य असल्यास ते केले जावे, जो कामगार कोरोनाबाधित होईल त्या कामगाराच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत संवाद साधला. ‘अनर्थ रोखायचा तर अर्थचक्र बाधित होते आणि अर्थचक्र सुरू ठेवायचे तर अनर्थ होतो, या कात्रीत आपण सापडलो असून या संकटकाळात मित्र होऊन सोबत राहणे महत्त्वाचे असते. राज्यातील उद्योगजगताने नेहमीच मित्रत्वाच्या भावनेने शासनास आतापर्यंत मदत केली आहे, सहकार्य केले आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत’, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘जिंदाल उद्योग समूहाने पुढे येऊन ऑक्सिजनच्या पुरवठय़ासाठी शासनाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. बाबा कल्याणी यांनी व्हेंटिलेटर्सची निर्मितीच नाही तर ते वापरण्याचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचारी आणि तंत्रज्ञांना देण्याची तयारीही दाखवली आहे. ही मदत अमूल्य आहे. काही उद्योजकांनी त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेण्याचीही तयारी दाखवली आहे. आपण सगळ्यांचे लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहोत’, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योगजगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. आठवडय़ाचे सातही दिवस आणि २४ तास लसीकरण व्हावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे, निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना कडक दंड लावावा, शिस्तबद्ध वर्तणूक राहावी यासाठी कडक नियमावली तयार करावी, लोकांचा रोजगार सुरू राहील हे पाहावे, जिथे शक्य आहे तिथे घरून काम करण्याच्या सूचना द्याव्यात, अशा विविध अपेक्षा या वेळी उद्योजकांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *