कारशेडसाठी पुन्हा पर्यायी जागा शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई: कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ सह मुंबईतील अन्य मेट्रो प्रकल्पांनी गती घेतली असली तरी कारशेडच्या प्रश्नावरून हे सर्वच प्रकल्प अडचणीत आले आल्याने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेचा वाद न्यायालयीन कचाट्यात सापडल्यामुळे कारशेडसाठी पुन्हा पर्यायी जागांचा शोध घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रोचे पर्यावरणाच्या मुद्यावरून आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यामुळे कारशेडसाठी जागेच्या शोधात असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मोठा दिलासा मिळाला होता. मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजनही उरकण्यात आले. मात्र, बहुतांश मेट्रो मार्गासाठी कारशेडची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. त्यामुळे मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला तरी कारशेडअभावी अनेक मेट्रो मार्ग रखडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकीकडे मेट्रो मार्गिकांची कामे पूर्णत्वास जात असताना तसेच मेट्रो-३ च्या गाडय़ाही तयार झालेल्या असताना कारशेडच्या जागेचा मात्र पत्ता नाही. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सरकारने आता हालचाली सुरू केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत नगरविकास विभाग तसेच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कारशेडच्या प्रश्नांचा आढावा घेतला. बैठकीत ठाण्यातील मोगरपाडा येथील जागेला शेतकऱ्यांचा होणारा विरोध दूर करण्याची जबाबदारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले आहेत.