‘पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकणात जाऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी चक्रीवादळामुळे झालेल्या कोकणातील नुकसानाचा प्राथमिक आढावा घेतला असून दोन दिवसात अंतिम आढावा घेऊन मदत जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील असून महाराष्ट्राला मदत करतील असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ‘पंचनामे पूर्ण झाले असून याचा आढावा घेतल्यानंतर मदत जाहीर करु. केंद्राच्या निकषाप्रमाणे तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत, पण एकूण आढावा घेतल्यानंतर आणखी काय करायचं असेल ते आम्ही करणार आहोत’, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधानांच्या गुजरात पाहणी करुन जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीवर विचारण्यात आलं असता आपल्याला त्यात राजकारण आणायचं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.