सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ

इंधनाच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असताना आता पुन्हा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे ४ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांना एक किलो सीएनजीसाठी ७६ रुपये मोजावे लागणार आहे. महिन्याभरात चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे ४ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅसच्या प्रति किलोसाठी ७६ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आज पहाटेपासून लागू झाली आहे. महानगर गॅस लिमिटेड हा मुंबई, ठाणे आणि परिसरात प्रमुख गॅस वितरक आहे. तसेच पीएनजीच्या किंमतीत वाढ होणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
भारत सरकारने १ एप्रिलपासून नैसर्गिक वायूच्या किंमतीत ११० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे एमजीएलकडून खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळेच सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे महानगर गॅस लिमिटेड कंपनीचे म्हणणे आहे.