Thu. Jan 27th, 2022

महाराष्ट्रात अनास्थेचे बळी वाढतायत

महाराष्ट्र: एखादी आपदा जेव्हा अचानक येऊन उभी ठाकते, तेव्हा आपल्या हातात असतं ते फक्त ‘लढत राहणं’. मग ती आपदा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित? याचा शोध घेणं जरी महत्वाचं असलं, तरी आधी उद्भवलेल्या संकटातून बाहेर पडण्याला प्राधान्य देणं जास्त शहाणपणाचं ठरतं. पण सरकारच्या सततच्या हलगर्जीपणामुळं नवनवीन संकटं उभी राहत असतील, तर काय? हा प्रश्न आज प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात नक्कीच पडला असेल! आणि त्यामागचं कारण म्हणजे विरार येथील रुग्णालयातील आगीची दुर्घटना!

गेले एक वर्ष संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढत आहे. सामान्य नागरिकांपासून ते सरकारपर्यंत प्रत्येक जण या महामारीतून देशाला बाहेर काढण्यासाठी आपापल्या पातळीवर जिवाच्या आकांताने प्रयत्न करताना दिसत आहे. या संपूर्ण लढ्यात रुग्णालयात खाटा न मिळणे, ऑक्सिजनचा तुटवडा, कोरोना लशींचा तुटवडा अश्या अनेक आव्हानांना आपण सर्वच जण सामोरे जात आहोत. परंतु , आपल्याच बेजबाबदारपणामुळे आणखी एखादं संकट उभं राहू नये, याची खरबदारी सरकारनं गरजेचं आहे. मात्र आज दुर्दैवाने असं होताना दिसत नाही.

काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या कक्षाला आग लागली आणि या आगीत १० निष्पाप चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी राज्य सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले. परंतु त्यानंतर लगेच काही दिवसांत भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत मॉलमधील सनराइज रुग्णालयातील तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी ‘मॉलमध्ये रुग्णालय’ असण्याबद्दल अनेकांनी आश्चर्यदेखील व्यक्त केलं होतं. याच महिन्यात नागपूर येथील वेल ट्रीट रुग्णालयाच्या आयसीयूला लागलेल्या आगीत ३ रुग्ण दगावले, तर नालासोपारा येथे वैद्यकीय प्राणवायूच्या अभावी १० रुग्ण दगावले. मग अशावेळी प्रश्न पडतो की राज्य सरकारच्या ‘त्या’ फायर ऑडिटच्या निर्देशाचं काय झालं? बरं,हे रुग्णालयांना आग लागण्याचं प्रकरण इथेच संपत नाही,तर प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे अशा अनेक घटना आजही घडत आहेत.

एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना, नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात नेमकी ऑक्सिजनच्या टँकमधूनच गळती सुरु होते? आणि मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असणारा ‘प्राण’वायू तब्बल २४ रुग्णांचा बळी घेतो? सरकार अशावेळी मदत जाहीर करतं, प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी ग्वाही देतं, सर्वसामान्य माणसं अशा घटनांवर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करतात, परंतु भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा उद्भवूच नये, यासाठी पावलं मात्र उचलली जात नाहीत.

आजची सकाळ सर्वांसाठीच मन सुन्न करणारी ठरली. विरार येथील कोरोना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश अंगावर शहारे तर आणत होताच, परंतु अनेक प्रश्नदेखील उपस्थित करत होता. भंडारा दुर्घटनेनंतर फायर ऑडिटचे निर्देश देऊन ३ महिने उलटून गेल्यावरदेखील राज्यात अश्या घटना घडतात? एखादी दुर्घटना घडल्यावर फक्त निर्देश काढले, मदत जाहीर केली की सरकारची जबाबदारी संपते का? त्या प्रकरणाचा पाठपुरवठा करून त्यावर शाश्वत उपाययोजना का केल्या जात नाहीत? असे अनेक प्रश्न आज सर्वसामान्यांच्या मनात आहेत.

थोडक्यात काय, तर राज्यात एखादी दुर्घटना घडते,त्यावर सरकारकडून चौकशीचे आदेश दिले जातात,मदत जाहीर केली जाते, काही दिवस त्याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते, विरोधी पक्ष टीका करतात,आरोप-प्रत्यारोप सुरु होतात, काही दिवसांनी पुन्हा एकदा सरकारच्या बेजबाबदारपणामुळे नवी दुर्घटना आ वासून उभी राहते आणि हे चक्र असंच सुरु राहतं. परंतु या दुष्टचक्रात होरपळून निघतो तो फक्त सामान्य माणूस!

(लेखकाच्या मताशी व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. लेखकाची मते स्वतंत्र आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *