‘ते’ विधान सत्य सिद्ध करून दाखवल्यास इंदुरीकर महाराजांना 25 लाखांचं इनाम, जैन यांचं आव्हान

हभप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात RPI चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कांतिकुमार जैन यांनी खुलासा करण्याची मागणी केली आहे. हभप इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे किर्तनादरम्यान ‘मुलगा होणार की मुलगी असा ‘Odd-Even Formula’ दाम्पत्यास सांगून कलम 22 अंतर्गत ‘गर्भलिंग निदान प्रतिबंध’ कायद्याचं उल्लंघन केल्याचा तसंच अशा विधानांद्वारे आम जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप होत आहे.

काय आहे जैन यांची मागणी?

जे जन्माला आले नाही त्यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य करून आपल्याला काय मिळणार आहे?

आपण जे सम/विषम तारखेचा स्त्रीसंग करण्याचा सल्ला दिला त्या मध्ये वैज्ञानिक तथ्य आहे का?

असं वाटतं, की फक्त क्षणिक टाळ्या मिळविण्याकरीता आपण असलं काहीतरी विधान केलं आहे.

आपलं विधान चुकीचं, दिशाभूल करणारे आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारं आहे, असं कांतिकुमार जैन यांनी हभप इंदुरीकर यांच्याकडे केलेल्या मागणीत म्हटलं आहे.

‘आपण आपलं विधान खरं आहे असं सिद्ध करून दाखवाच. मग मी कांतिकुमार जैन आपणास 25 लाखांचं बक्षीस जाहीर करतो. अन्यथा दिशाभूल करण्यासाठी तमाम जनतेची आपण जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी आहे.’ असं आव्हानच जैन यांनी दिलंय.

या मागणीला हभप इंदुरीकर महाराज कसा प्रतिसाद देतात, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

काय म्हणाले होत हभप निवृत्ती इंदुरीकर महाराज?

‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असे विधान करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर केलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून घेण्यात आला आहे.

गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून PCPNDT कायद्याच्या कलम 22चं उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या भोवती कायद्याचे फास आवळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version