संपूर्ण देशात ३ आठवड्यांचं लॉकडाऊन, पंतप्रधानांची घोषणा

जनता कर्फ्यूनंतर आता कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता जनतेला संबोधित केलं. यावेळी सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनाशी लढण्याचा एकमेव उपाय असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
कोरोनाची संक्रमण सायकल तोडण्यासाठी २१ दिवस आवश्यक असल्याचं मेडिकल विशेषज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा, देशाचा बचाव करण्यासाठी २१ दिवस घरात बंद राहणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलं आहे. जर २१ दिवस हा बंद पाळला नाही, तर देश २१ वर्षं मागे जाईल. जर २१ दिवस लॉकडाऊन पाळला नाही, तर त्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शरीरात कोरोनाची लक्षणं दिसायला बरेच दिवस लागतात. तो कोरोनाग्रस्त आहे, हे समजेपर्यंत अशी व्यक्ती अनेक लोकांमध्ये मिसळली असते. पहिले १ लाख कोरोनाग्रस्त होण्यासाठी ६७ दिवस लागले होते, मात्र पुढील १ लाख कोरोनाग्रस्त अवघ्या ११ दिवसांत झाले. त्याही पुढील १ लाख कोरोनाग्रस्त अवघ्या 4 दिवसांत तयार झाले. याचाच अर्थ कोरोनाचा संसर्ग अत्यंत वेगाने होऊ लागतो.
कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक आठवडे काही देशांतील नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळेच ते देश कोरोनाच्या सापळ्यातून मुक्त होत आहेत. आपणही हे लक्षात घेतलं पाहिजे, की काहीही झालं तरी घराबाहेर न पडणं हाच एकमेव उपाय लक्षात ठेवून गावातल्या सामान्य नागरिकापासून ते पंतप्रधानांपासून सर्वांनी याचं पालन करणं आवश्यक आहे.
आज भारत अशा परिस्थितीत आहे, जेव्हा आपण जेथे आहोत, तेथेच राहणं बंधनकारक आहे. घराची लक्ष्मणरेषा न लांघणं हाच संकल्प आहे.