Fri. Sep 30th, 2022

पर्रिकरांच्या आजारपणामुळे गोव्यात पेच, सत्तेसाठी राजकीय रस्सीखेच

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एकीकडे भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आपणाला सत्ता स्थापनेची संधी मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मुख्यमंत्री पर्रिकर दिल्ली येथील एम्स मध्ये उपचार घेई पर्यंत राज्यातील आघाडी सरकार सुरळीत चालावेयासाठी भाजपने 3 निरीक्षक पाठवून आपल्या आणि घटक पक्षाच्या आमदारांची मतं दोन दिवसांत जाणून घेतली. त्याच वेळी आजारी सरकारवरील दबाव आणखी वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यपालांना पत्र सादर करून गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेसची भूमिका

भाजप आणि घटक पक्षांची पर्रिकर यांच्या गैरहजेरीत सरकार सुरळीत चालवण्यासाठी धडपड़ सुरु असतानाच काँग्रेस विधीमंडळ गटाने आज बैठक घेऊन राज्यपालांना भेटण्याचा निर्णय घेतला. बैठकी नंतर काँग्रेस आमदारांनी राजभव गाठून त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.

गोव्यात काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे यापूर्वीच आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणे गरजेचे होते. सध्या गोव्यात सरकार असूनही नसल्याप्रमाणेच आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला आहे.असं राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील आमदारांना जनतेने 5 वर्षांसाठी निवडून दिले असल्याने भाजपने विधानसभा बरखास्त करण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केल्यास तो मान्य करू नये अशी मागणी देखील काँग्रेस आमदारांनी केली आहे.

 

भाजपची धावपळ

दरम्यान, सरकारचे नेतृत्व कुणी करावे याबाबत भाजपच्या आमदारांमध्ये आणि एकूणच पक्ष संघटनेतही दोन गट आहेत. भाजपच्या तीन सदस्यीय केंद्रीय निरीक्षक समितीने आमदारांना प्रत्यक्ष भेटून आणि त्यांचे म्हणणे जाणून घेऊन भाजपमधील प्राप्त स्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपमधील एका गटाला नवा नेता हा भाजपमधूनच निवडला जावा असं वाटतं, तर दुसरा गट मात्र बाहेरून नेता आणला तरी चालेल पण त्या नेत्याच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण व्हावं असा मुद्दा मांडत आहे.

भाजपचे निरीक्षक अध्यक्ष अमित शहा यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर दिल्ली मधील एम्स मध्ये उपचार घेत असलेल्या पर्रिकर यांच्याशी सल्लामसलत करून पर्यायी व्यवस्थेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सुदिन ढवळीकर होणार मुख्यमंत्री?

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पर्रिकर यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्रीपदाची सुत्रे मंत्रीमंडळात सर्वांत ज्येष्ठ असलेल्या मंत्र्याला पर्यायाने बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कडे सोपवावी, अशी मागणी रेटून धरली आहे.

गोवा फॉरवर्डचं शक्तीप्रदर्शन!

सरकारमधील दुसरा महत्वाचा घटक पक्ष असलेला गोवा फॉरवर्ड मात्र याच्याशी सहमत नाही. भाजप नेत्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी केली आहे. सरदेसाई यांनी काल भाजप निरीक्षकांची भेट घेताना आपल्या पक्षाच्या आमदारांबरोबरच सरकार मध्ये सहभागी झालेल्या 3 अपक्ष आमदारां सोबत घेऊन शक्तीप्रदर्शन करत आपल्याला कमी लेखू नये असा संदेश दिला आहे.

राज्यात वेगाने घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजारपणामुळे आपला कार्यभार सांभाळू शकत नसलेल्या मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या जागी दूसरा नेता नेमला जातो की अन्य कोणती तरी व्यवस्था केली जाते काय याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.