काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव सातव यांचं निधन झालं. काही दिवसांच्या उपचारानंतर सातव यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, त्यानंतर मात्र त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला होता.

गेल्या २३ दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरु होती.आज सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजीव सातव यांच्या निधनाची दुःखद बातमी अधिकृतपणे ट्वीट करुन दिली. काँग्रेसचे अभ्यासू नेते म्हणून राजीव सातव यांना ओळखलं जायचं. सामान्य कार्यकर्त्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी त्यानंतर पक्षानं दिलेलं महाराष्ट्र युवक काँग्रेसचं अध्यक्षपद, दोन वेळा खासदारकी आणि काँग्रेस पक्षाची सर्वोच्च वर्किंग कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तींयांपैकी ते एक होते.

गेल्या काही वर्षांच्या काँग्रेसच्या प्रवासात राजीव सातव यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद होतं. तसेच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते.

खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी हिंगोलीतील कळमनुरी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Exit mobile version