संबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड

भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड केले आहे. काँग्रेस टुलकिट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी केला आहे.

भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी एका टूलकिटचा उल्लेख केला आहे. या टूलकिटचा वापर करुन काँग्रेस भाजप आणि पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, काँग्रेस कोरोनाच्या इंडियन स्ट्रेनचा मोदी स्ट्रेन म्हणून उल्लेख करत आहे. तसेच कुंभमेळा कोरोनाचा सुपरस्प्रेडर असल्याचे सांगायचे आहे. तसेच नेत्यांना ईद मेळाव्याबाबत मौन बाळगण्यास सांगायचे.

तसेच पूर्वीच्या नागरी नोकरदारांना पीएम केअर्सविषयी प्रश्न उपस्थित करण्यासाठी एकत्र करा,कोणतीही सेलिब्रिटी पीएम केअर्सला देणगी देत ​​असल्यास, त्यांना आक्रमकपणे सवाल करा, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये पीएम केअर्स फंडद्वारे पाठविलेले व्हेंटिलेटर विनावापर पडून आहेत. ते सदोष आहेत, असे आरोप करा. पीएम केअर्स  प्रत्येक पैलूवर आणि त्याद्वारे घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आरटीआय दाखल करण्यासाठी आरटीआय कार्यकर्त्यांना एकत्र करा. यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांना प्रचार करण्यास सांगितलंय, असा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे.

दरम्यान संबित पात्रा यांनी ‘काँग्रेस नेते राहुल गांधी रोज सकाळी ट्विट करतात तो टूलकिटचा भाग आहे. ज्या प्रकारे मोदी सरकारला बदनाम करण्यात येत आहे. यामध्ये जाणूनबुजून कुंभ मेळ्याचा उल्लेख केला जात आहे’, असं म्हटलं आहे.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी समाजात फूट पाडून विष कालवण्यात काँग्रेस निष्णात असल्याचं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनीसुद्धा ट्विट केले आहे. ‘काँग्रेसने त्यांच्या राजकारणाची भरभराट व्हावी, यासाठी त्यांनी भारताला त्रास द्यावा आणि रक्त द्यावे अशी त्यांची इच्छा आहे.भारताच्या पराभवात ते त्यांचे राजकीय पुनरुज्जीवन शोधतात.’, असं ट्विट तेजस्वी सूर्या यांनी केलं आहे.

दरम्यान, भाजपने केलेले आरोप काँग्रेसकडून फेटाळण्यात आले असून हे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. तसेच संबित पात्रांवर एफआईआर दाखल करणार असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

Exit mobile version