Wed. Oct 5th, 2022

‘राज्यात घटनात्मक पेच निर्माण होतोय’ – देवेंद्र फडणवीस

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून अटक करण्यात आली. आठ तास चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर मलिकांना न्यायलयात हजर करण्यात आले. न्यायलयात नवाब मलिकांचे वकील आणि ईडीचे वकील यांच्यात चार तासांच्या युक्तीवादानंतर पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राज्यात घटनात्मक पेच निर्माण होतोय, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार खोटे साक्षीदार तयार करत असल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे लवकरच खोटे साक्षीदार तयार करण्याचे पुरावे सादर करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. तर न्यायालयाने मलिकांना आठ दिवस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही, असे आदेश राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे नवाब मलिकांना मंत्रीपदावर कायम ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘मलिकांचे दाऊदशी आर्थिक संबंध उघड’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ईडीने केलेली कारवाई नियमानुसार आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या बहिणीशी व्यवहार केल्यामुळे न्यायालयाने मलिकांना कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दाऊद आणि त्यांच्या बहिणीशी आर्थिक व्यवहाराचे समर्थन निंदनीय असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच एनआयच्या तपासात नवाब मलिकांचे दाऊदसोबत असलेले आर्थिक संबंध उघड झाल्याचेही फडणवीस म्हणाले. ते म्हणाले, आर्थिक व्यवहाराचा दहशतवादासाठी वापर होत आहे. मलिकांनी मंत्री पदावर बसून दहशतवाद्यांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे दाऊदसोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.