Mon. Aug 15th, 2022

मशिदीबाबतच्या वादाचं लोण आता पुण्यातही

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्याने सध्या या घटनेची देशभर मोठी चर्चा होत आहे. या मुद्द्यावरून दोन गट समोरासमोर आलेले असतानाच आता पुण्यातही या वादाचं लोण पोहोचलं आहे. शहरातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागांवर दर्गा उभारण्यात आल्याचा दावा मनसे नेते अजय शिंदे यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या मेळाव्यात केला. अजय शिंदे यांच्या या दाव्यानंतर आता शहरातील वातावरण चांगलंच तापलं असून हिंदू महासंघानेही या वादात उडी घेतली आहे.

ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदीरांच्या जागेवर छोटा शेख आणि बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदीरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलंय.

काल पुण्यात मनसेची सभा झाली. या सभेत बोलताना अजय शिंदे म्हणाले, पुण्येश्वरालाही मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिल्जीचा बडा अरब हा सरदार पुण्यावर चाल करून आला होता, त्यावेळी त्यानं भगवान शंकराचं मंदिर उध्वस्त केलं होतं. फक्त एकच नाही तर पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन्ही मंदिरं उध्वस्त केली होती. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे तर दुसरं लालमहालाच्या थोडं पुढे आहे. आज तिथं छोटा शेख दर्गा आहे. सगळ्या मंदिरांच्या वर या मशिदी उभारण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.