Thu. May 13th, 2021

कोरोनामुळे तमाशा कलाकार झाले हवालदिल, सरकारकडून मदतीची अपेक्षा

कोरोनाने जगात थैमान घातले आहे. यामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच याचा फटका अन्य गोष्टींवरही मोठ्या प्रमाणात बसला आहे.

कोरोनामुळे सरकारने यात्रा-जत्रा उत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम तमाशा कलावंतांवर झाला आहे. कोरोनाचा फटका नाट्यसृष्टी प्रमाणेच तमाशाला बसल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

तमाशा पंढरी ओळख असलेल्या नारायणगावांमध्ये बैलगाडे बंद असून तमाशा ठरवण्यासाठी कोणीही फिरकत नसल्याने तमाशा फंड मालक धास्तावले आहेत. ग्रामीण भागात यात्रा म्हटले की बैल गाडा शर्यत आणि तमाशाचे फंड लोकप्रिय आहे.

मात्र गेल्या कित्येक वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आली आहे. त्यामुळे आता यात्रेमध्ये फक्त तमाशा पाहायला गावकरी येत असतात. त्यातच कलाकारांसोबत तमाशा पाहायला आलेले प्रेक्षकही बेभान होतात. तमाशातील गाणी आणि विनोद यांना रसिक प्रेक्षक चांगली दाद देतात.

मात्र, यंदा फंड रंगणं तर सोडाच पण तमाशाला सुपारीच मिळत नसल्याने तमाशा मालक चांगलेच धास्तावले आहेत.एका तमाशा फंडात दिडशे ते दोनशे कलाकार काम करत असतात. यातुनच त्यांचा संसाराचा गाडा हाकला जातो.

गेल्या चार वर्षापासुन तमाशाला ग्रहण लागलं आहे. दुष्काळ,नोटबंदी, निवडणूका आणि आता कोरोना यापुढे हे तमाशा कलावंत हतबल झाले आहेत. यामुळे जगायचं कसं असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

कोरोनामुळे नारायणगावात तमाशाची बारी ठरवण्यासाठी येणारे गाव पुढाऱ्यांचे आता येणे बंद झाले आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात यात्रा उत्सव सुरू होतात.

त्याआधी दरवर्षी साधारणपणे पंधराशे सुपारी बुक होतात. त्यातून सुमारे दहा ते बारा कोटींची उलाढाल होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे तमाशाचा तमाशाच झाला असल्याचे तमाशा कलाकारांचे म्हणणे आहे.

मागील ८० वर्षांपासूनची तमाशा कलावंतांची ही परंपरा संकटात सापडली आहे.त्यामुळे सरकारने या तमाशा कलावंताच्या कलेची कदर करुन मदतीचा हात पुढे करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोना विषाणूमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. मात्र उन्हाळ्यात सुट्टी मध्ये असलेला यात्रा हंगाम संपल्यानंतर तमाशा होणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *