Corona Effect : शुक्रवारपासून ‘डबेवाल्यांची सेवा बंद’

राज्यात ताज्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची संख्या ४९वर जाऊन पोहचली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या आवाहनाला व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
व्यापारी वर्गानेही दुकानं बंद ठेवली आहेत. यानंतर आता डब्बेवाला संघटनेनेही ३१ मार्चपर्यंत डबा सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कशीही परिस्थिती असली तरीही मुंबईचा डब्बेवाला हा त्याच्या ठरलेल्या वेळेवर डब्बा पोहचवचो. डब्बेवाले त्यांच्या नियोजनासाठी तसेच त्यांच्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात.
वर्षातून आषाढी एकदशीच्या आधी १ दिवसआधी सुट्टी घेतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सेवा शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डब्बा सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवणार आहे.
राज्यातील एकूण ४९ रुग्णांपैकी २ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. या ४९ पैकी ४० रुग्ण हे परदेशवारी करुन आल्याने यांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर उर्वरित ९ जणांना त्यांच्या संपर्कात आल्याने कोरोना झाला.
राज्यातील शाळा-महाविद्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद आहेत. राज्यातील कोरोनाचा संसर्ग वर्ग-२ गटातला आहे. त्यामुळे हा कोरोना आवाक्याबाहेर गेलेला नाही.
मात्र राज्यातील कोरोनाचा संसर्ग हा वर्ग-२ मधून वर्ग-३ मध्ये गेल्यास नाईलाजाने रेल्वे, बससेवा खंडित करावी लागेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
कोरोनामुळे इतर ठिकाणी शुकशुकाट असताना रेल्वेत मात्र अपवादात्मक ठिकाण सोडता, सर्व ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.
या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे विधान केलं. उद्धव ठाकरेंनी आज गुरुवारी राज्यातील जनतेसोबत फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. तसेच आरोग्यमंत्र्यांनीही पत्रकार परिषदेतून लोकांना आवाहन केलं.