Mon. Jan 17th, 2022

‘डीआरडीओ’च्या औषधाला मान्यता

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ या कोरोना प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध कोरोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल. ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ हे औषध रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे अवलंबित्व कमी करत असल्याचे चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

‘कोविड-१९च्या सध्याच्या दुसऱ्या लाटेत फार मोठ्या संख्येतील रुग्ण प्राणवायूवर अवलंबून असून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे. संसर्ग झालेल्या पेशींमध्ये हे औषध ज्या रीतीने कार्य करते, त्यामुळे ते अनेक मौल्यवान जीव वाचवण्याची अपेक्षा आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांचा रुग्णालयातील वास्तव्याचा कालावधीही कमी होईल’, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

२-डीजी हे औषध डीआरडीओतील आघाडीची प्रयोगशाळा असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेसने हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने विकसित केले असल्याचीही माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. सहायक उपचारपद्धती ही प्राथमिक उपचारांना मदत म्हणून वापरली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *