Corona : सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर होईल, संजय राऊतांचा निशाणा

टाळेबंदी केल्यानंतरही जनता गांभीर्याने घेत नाही आहे, मोदींच्या या ट्विटला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
देशातील जनता टाळेबंदीला गंभीरतेने घेत नाहीयेत, याची चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटतेय. प्रिय पंतप्रधान तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणात देखील सण असल्यासारखी स्थिती निर्माण केली आहे. मग तर असंच होणार. सरकारला गांभीर्य असेल तर जनता गांभीर्याने घेईल, जय हिंद जय महाराष्ट्र.
राज्यासह देशातील आपातकालीन स्थितीत सेवा देणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी थाळीनाद करण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं. या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. मात्र काही अतिउत्साही लोकांनी घराबाहेर पडून जनता कर्फ्युचं उल्लंघन करत जमावबंदी केली होती.
मोदींनी काय म्हटलंय ट्विटमध्ये ?
लॉकडाउनला आतासुद्धा लोकं गांभीर्याने घेत नाहीयेत. कृपया करुन स्वत:ची काळजी घ्या. आपल्या परिवाराची काळजी घ्या. सरकारच्या सूचनांचं पालन करा. राज्य सरकारला माझी विनंती आहे की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अंमलबजावणी करा, असं आवाहन मोदींनी केलं.
दरम्यान राज्यात आज कोरोनामुळे राज्यात तिसरा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा 89 वर पोहचला आहे.