नगरमध्येही कोरोनाचा शिरकाव, आढळला कोरोनाबाधित रूग्ण

कोरोना व्हायरसने चीननंतर आता भारतातही थैमान घातला आहे. या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातही याचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान अहमदनगरमध्ये एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पुण्यामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या सानिध्यात आलेल्या अन्य प्रवाशांची प्रशासनाने तपासणी सुरू केली आहे.
अहमदनगरमध्येही या प्रवाशांसोबत चार जणांनी प्रवास केल्याचे पुढे आल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची तपासणी करून थुंकी आणि रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते.
या चारपैकी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी दिली. संबंधित रुग्णाला अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.
या रुग्णांची प्रकृती स्थिर व चांगली असून अद्याप सर्दी ताप खोकला अशी लक्षणे आढळलेली नाहीत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे.