Jaimaharashtra news

राजकारण, स्वार्थकारण की सत्तेचे उन्मादीकरण?

अशोक कारके, औरंगाबाद: कोणत्याही पक्षाचं सजीव असणं हे त्या पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांवर अवलंबून असतं. अन्यथा पक्षाला उतरती कळा लागू शकते. तशीच उतरती कळा काँग्रेसलादेखील लागली आहे. आज देशातील कोरोनाची भयावह परिस्थिती आणि पाच राज्यांमधील निवडणुकांची रणधुमाळी पाहिली, तर भाजपही काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकून चालत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेसच्या काळात केंद्रातील सत्तेच्या झालेल्या गैरवापराबाबत आपण परिचितच आहोत. जागतिक महामारीच्या काळात सरकारने देशाकडे ‘आपले कुटुंब’ म्हणून पाहिले पाहिजे. जागतिक महामारी काळात देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र हे नागरी वसाहत असणारे, त्याचप्रमाणे केंद्राला सर्वाधिक उत्पन्न देणारे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. मात्र कोरोनाचा सर्वाधिक फटका आज महाराष्ट्राला बसत आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्राला लोकसंख्येच्या तुलनेत केंद्राकडून मदत होत नसल्याचा दावा अनेकदा राज्य सरकारने केला. कोरोना लसीकरण आणि आता रेमडेसिवीर या दोन्हीचा पुरवठा गरजेनुसार होत नाही, असं दिसून येत आहे. असं असलं तरीही आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र हे देशाचे हृदय आहे याचा विसर पडता कामा नये.

जागतिक महामारीच्या काळात देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. मात्र एका म्हणीप्रमाणे, युद्धात, प्रेमात आणि आता राजकारणात ‘सबकुछ जायज’ असं चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी या राज्यांमध्ये निवडणुकांकरिता जो उत्साह आणि गर्दी दिसत आहे, त्यामुळे देशात येत्या काळात कोरोनाचे काय चित्र असेल, याचा विचार न केलेलाच बरा! आज महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे देशात राजकीय सभांना लाखोंच्या संख्येने गर्दी पाहायला मिळत आहे. हे चित्र देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे.

१)कोरोना फक्त सरकारला वाटेल तेव्हाच येतो का?
२) कोरोनाची त्रिसूत्री उपाययोजना आहे का?
३) राजकीय नेत्यांना कोरोनाच्या नियमातून सूट आहे का?
४) विनामास्क फिरणाऱ्यांवर होणारी कारवाई फक्त सामान्य नागरिकांवरच का?
५) सामाजिक अंतराचा नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का?

आपला देश संकटात असताना ही वेळ राजकारण करत बसण्याची नाही, तर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे देश वाचवण्याची आहे. सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आणि विरोधकांनी राजकारणविरहित सहकार्य करणे ही जनतेची राजकारण्यांकडून अपेक्षा आहे. कोरोनामुळे लाखो लोकांनी जीव गमावले आहेत. यामध्ये काही लोकप्रतिनिधींचासुद्धा समावेश आहे. त्यामुळे सर्वांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

(लेखकाच्या मताशी व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. लेखकाची मते स्वतंत्र आहेत.)

Exit mobile version