Mon. Dec 6th, 2021

कोरोनाचा विळखा पाहता लंकापती रावणाचे दहन कार्यक्रम देशभर रद्द…

दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय…

स्नेहा कांबळे, जय महाराष्ट्र मुंबई : दसरा म्हणजेच विजयादशमी हा भारतातील महत्वाचा आणि प्रतिष्टीत असा सण आहे. देवीच्या घटाची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. तसेच विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वती देवीचेही पूजन विशेषत्वानं केली जाते. विशेष म्हणजे हा सण भारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केला जातो.भारतातील काही भागात, नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास पूर्ण केले जातात तर काही भागात रामाने रावणावर विजय केला म्हणून हा सण साजरा करतात आणि काहीजण देवी दुर्गाने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा सण साजरा करतात अशा प्रकारे भारतातील अनेक भागात हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.


महाराष्ट्रात देखील दसरा या सणाचं विशेष महत्त्व आहे. कातकरी आदिवासी स्त्रिया ह्या दिवशी त्यांचं पारंपरिक नृत्य करून दसरा हा सण साजरा करतात. या दिवशी घरोघरी दाराला आंब्याच्या झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. शस्त्र पूजा तसेच विविध यंत्रे वाहने ह्यांना हार घालून त्यांची पूजा केली जाते. भारतात विविध ठिकाणी दसरा हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात जरी थोडेफार बदल असला तरी त्यामागील भावना मात्र एक असते. दसरा ह्या सणातून आपल्याला जर काही शिकायला मिळते तर ते म्हणजे असत्यावर सत्याचा विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय.


यंदा कोरोनाचा विळखा पाहता लंकापती रावणाचे दहन करण्याचा कार्यक्रम देशभर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे इतर सणांप्रमाणे दसऱ्यावर देखील कोरोनाने विरझण घातले आहे.
मुळात आजच्या घडीला खरंच रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यापुरता दसरा सीमीत झाला आहे का? असा प्रश्न पडतो. परंतु फक्त रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन झाले,आपट्याच्या पानांचे वाटप झाले की दसरा झाला असे समजणाऱ्या तल्लख बुद्धीजीवांची आपल्या इथे कमी नाही. दसरा हा जेवढा जुना पारंपरिक सण आहे, तितकेच त्याचे महत्त्व आहे. ह्या वेळेस रावणाचे दहन सार्वजनिक ठिकाणी होत नसले तरी आपण आपल्या मधील रावण वृत्तीचे आणि अहंकाराचे,रागाचे,लोभाचे,वाईट व्यसनाचे, क्रोधाचे दहन करू शकतो.


भारतात उत्तर प्रदेश मधील हाथरस सारखी संताप आणणारी घटना घडते जेथे एखाद्या स्त्रीला अनादर तर खूप छोटा शब्द आहे परंतु क्रूरतेने ओरबाडून मरण यातनेमध्ये सोडून दिले जाते . त्यानंतर काही दिवसांनी नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीचा आदीशक्तीचा उध्दार केला जातो. दसऱ्यामध्ये रावण रुपी वाईट सवयींचे दहन पुतळ्या मार्फत केले जाते. ह्या दोन्ही गोष्टी चुंबकाच्या दोन ध्रुवाप्रमाणे एकमेकांच्या विरुद्ध मानसिकतेचे दर्शन देतात. केवळ दसऱ्यापुरते आपल्यातील वाईट सवयी सोडून द्यायचा आणि वर्षभर पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी ह्या दुटप्पी अशी भूमिका सोडून द्यायला पाहिजे.
आधुनिक भारतात सर्व सुख सोयी असताना आपण आपले विचार, मानसिकता बदलायचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे आपले जीवन सुपीक आणि प्रगल्भ होईल. त्यावेळेस खरोखरच आपण खऱ्या रावणाचे दहन केले असे बोलू शकतो. ह्या दसऱ्याला कोरोनाचे भारतातून सीमा उल्लंघन नाही होऊ शकत परंतु आपल्यातील रावणाचे सीमा उल्लंघन नक्कीच होऊ शकते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *