Mon. Oct 25th, 2021

३.८६ कोटी नागरिकांना कालमर्यादेत लाभ न मिळाल्याची सरकारची कबुली

देशातील ३.८६ कोटी नागरिकांना लशीची दुसरी मात्रा निर्धारित कालावधीत मिळाली नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. लसटंचाईमुळे लसीकरण मोहीम मंदावल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.

कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या लसमात्रेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते रमण शर्मा यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार याबाबत अर्ज केला होता. कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या किती नागरिकांना दुसरी मात्रा निर्धारित कालमर्यादेत मिळाली नाही, याची आकडेवारी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागितली होती.

कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर ८४ ते ११२ दिवसांत दुसरी मात्रा, तर कोव्हॅक्सिन लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर २८-४२ दिवसांत दुसरी मात्रा घ्यावी, अशी कालमर्यादा सरकारने निश्चित केली आहे. मात्र, १७ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ३,४०,७२,९९३ नागरिकांना कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा निर्धारित कालमर्यादेत मिळाली नाही. तसेच कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या ४६,७८,४०६ नागरिकांना दुसरी मात्रा निर्धारित कालमर्यादेत मिळाली नाही, अशी कबुली सरकारने दिली आहे.

कोरोना प्रतिबंधक लशीच्या संपूर्ण लाभासाठी दोन मात्रा घेणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे. संमिश्र लशी फायदेशीर असल्याचे संशोधानातून स्पष्ट झाले असले तरी याबाबत अद्याप सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. लसलाभार्थींनी एकाच कंपनीच्या दोन लसमात्रा घ्याव्यात, अशी सरकारची सूचना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *